CM Devendra Fadnavis react on congress Priyank kharge letter for ban on RSS shakhas in government premises : कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी राज्यभरातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे (RSS) कार्यक्रम आयोजित करण्यावर तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यापूर्वीही बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर इंदिरा गांधींना पद सोडावे लागले होते असे म्हटले आहे, याबरोबरच त्यांनी प्रियांक खरगे यांच्यावर टीका देखील केली आहे. प्रियांक खरगे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कर्नाटकचे हे प्रियांक खरगे आहेत, हे प्रसिद्धीकरिता असल्या गोष्टी करत असतात. त्यांना काहीच स्टँडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे आहेत. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, नव्हे बंदी घातली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्त संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मुल्याधिष्ठीत अशा मानवनिर्मितीचे कार्य संघ करतं. प्रसिद्धिसाठी अशा प्रकारचे पत्र देतात त्याकडे आम्ही ढुंकूनही पाहात नाहीत.”
प्रियांक खरगे यांची मागणी काय आहे?
प्रियांक खरगे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संस्था सरकारी शाळा व सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनं आयोजित करते, या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात. यामुळे मुलांच्या मनात नकारात्मक विचारांची पेरणी केली जात आहे. काठ्या घेऊन प्रचारफेऱ्या काढल्या जातात. यामुळे निरागस मुलं आणि तरुणांची मानसिकता नकारात्मक बनत आहे.”
प्रियांक खर्गे पुढे पत्रात म्हणाले, “शासकीय शाळा, सरकारमान्यताप्राप्त शाळा व सार्वजनिक ठिकाणी आरएसएशकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनांवर जसे की त्यांच्या शाखा, बैठका, सांघिक व परेडवर पूर्णपणे बंदी घालावी.”