उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील आणि ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ असा असून सर्व समाजघटकांना दिलासा देणारा आहे. त्यांचा विचार करणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाचा विचार पुढे नेणारा आहे. मी अजित पवार यांचे अभिनंदन करतो. महिला, युवा आणि शेतकऱ्यांना समर्पित असा हा आजचा अर्थसंकल्प आहे. सातत्यपूर्ण विकासाचा यात निर्धार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – “चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”

पुढे बोलताना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांची माहितीही दिली. “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह १५०० रुपये देण्यात येणार असून यासाठी ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ३ सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून ४५ लाख शेतकऱ्यांना वीजमाफी दिली जाणार आहे. यासाठी ७७७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. तसेच सौर ऊर्जा योजना याच्या अंमलबजावणीचा विचार सुद्धा केला आहे. १८ महिन्यात ही योजना पूर्ण करायची आहे, त्यामुळे ३० टकाके अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकणार आहोत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर, “अडीच वर्षे ज्यांनी लाडका बेटा..”…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. या हवेतील घोषणा नाहीत, तर विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत. हा थापांचा नाही, तर माय-बापांचा अर्थसंकल्प आहे”, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे विरोधकांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे बोलताना, “कोरोना, दुष्काळी वर्षात दरडोई उत्पन्नात कमी-अधिक होणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही प्रगत राज्याच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. आर्थिक बेशिस्तीकडे राज्य जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.