मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अभिनेता अक्षय कुमारने घेतली. फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. गोरेगावमधल्या चित्रपटसृष्टीचं रुप आम्ही येत्या चार वर्षांत बदलणार आहोत असंही देवेंद्र फफडणवीस यांनी म्हटलं आहे.तसंच अनिल कपूर यांच्या भेटीचा किस्साही सांगितला.

देवेंद्र फडणवीस आणि नायक चित्रपटाचा किस्सा

तुम्ही राजकारणातले स्टार आहात, तुमच्यासाठी चित्रपटसृष्टीतली अशी कुणी व्यक्ती किंवा चित्रपट आहे का ज्यांचा प्रभाव तुम्हाला जाणवतो? असा प्रश्न अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, “चित्रपट आपल्याला संवेदना शिकवतात. राजकारणाबाबत बोलायचं झालं तर एक चित्रपट आहे ज्याने मला अडचणी वाढल्या आहेत असं मला वाटतं. तो चित्रपट आहे नायक. अनिल कपूर त्यात एक दिवसाचे मुख्यमंत्री होतात आणि धाडधाड कामं करतात. मी जेव्हा अनेक ठिकाणी जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही ‘नायक’सारखं काम का करत नाही? त्या चित्रपटातल्या मुख्यमंत्र्याने एका दिवसात किती कामं केली. मला एक दिवस अनिल कपूर भेटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की नायक चित्रपट का केलात? तुम्ही नायक आणि आम्ही नालायक असं आता लोकांना वाटू लागलंय. एक दिवसात तुम्ही इतक्या गोष्टी केल्या. एक बेंचमार्क सेट करण्याचं काम नायकने केलं आहे. पण चित्रपट बघायला मला आवडतात. एकाच क्षेत्रात काम करुन तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. तुमच्या संवेदना जिवंत ठेवण्याचं काम चित्रपट करतात.”

एक दिवसाचे दिग्दर्शक झाला तर?

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात आणि महाराष्ट्र नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलात तर कुठला सीन चित्रीत कराल? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले जर महाराष्ट्र हा चित्रपट असेल आणि त्यातला पहिला सीन चित्रीत करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी बसले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं तोच पहिला सीन असेल. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

राजकारणातले हिरो कोण?

राजकारणातले रिअल हिरो कोण? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले की भारताच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर राजकीय हिरो मला नरेंद्र मोदी वाटतात. गरीबी हटाव चा नारा सातत्याने लागला. पण १० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य्र रेषेखालून वर आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. इतकंच नाही तर प्रत्येक क्षेत्रात भारत इतरांशी बरोबरी करतो आहे हे नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.