Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
उमेदवारी देण्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भाजपने उमेदवारी देताना विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर काहींची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांना उमदेवारी नाकारण्यात आली आहे. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. उमेदवारी देताना तीन प्रकारचा अभ्यास केला गेला. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यात विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा अभ्यास केला गेला. शिवाय ज्यांच्या बाबतीत नाराजी जास्त त्यांना उमेदवारी नाही, ज्यांच्याबाबत नाराजी कमी त्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
फेक नरेटिव्ह आता चालणार नाही
हरियाणाबाबत सगळे पोलपंडीत सांगत होते भाजपाचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाली. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आलं. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवलं. आमच्यात फक्त पॉईंट ३ पर्सेंटचा फरक होता. फेक नरेटिव्ह आम्ही उघडा पाडला. लोकांच्या लक्षात आलं की ते खोटं बोलत होते. राहुल गांधींनी आरक्षण कसं संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच रि ओढत आहेत. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळं आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसंच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आलं की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. एनडीटीव्ही मराठी कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महायुतीला किती जागा मिळणार? काय म्हणाले फडणवीस?
“मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही पण इतकं निश्चितपणे सांगतो की महायुतीला चांगलं बहुमत मिळेल आणि भाजपा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असेल. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे मिळून आम्ही बहुमत मिळवू.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
मी १०० प्रकल्प सांगू शकतो, विरोधकांना माझं आव्हान आहे की..
आमच्या विरोधकांना माझं खुलं आव्हान आहे त्यांनी महाराष्ट्र परिवर्तित करणारा एक प्रकल्प सांगावा त्यांना तो सांगता येणार नाही. मी १०० प्रकल्प सांगू शकतो. कोस्टल रोडचं क्रेडिट आमचे विरोधक घेतात पण ते तर ताजमहाल आम्ही बांधला असंही सांगू शकतात. सध्या ते ताजमहाल बांधणाऱ्या वंशजांसारखेच वागत आहेत. त्यांचं या कोस्टल रोडमध्ये काय योगदान आहे? काहीच नाही असाही टोला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी लगावला.