अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे पडसाद थेट सभागृहात उमटताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात देखील हीच बाब दिसून येत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायलयात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. त्यासंदर्भात सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होता की…”

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांची याचिका फेटाळल्यावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. आज उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडीची कारवाई योग्य आहे. आता माझा सवाल आहे की बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदच्या माणसासाबोत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांची याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं. “याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जो खड्डा खणतो, तोच त्यात पडतो”

दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सरकारकडून केल्या जात असलेल्या कारवाईला घाबरत नसल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. “आम्ही याला घाबरत नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही न्यायालयात जाऊ. पण भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलत राहू. मला कल्पना आहे की अनेक खोटे गुन्हे दाखल होतील. आम्ही त्याची पर्वा करत नाही. लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सरकारकडून होत आहे. मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो, जो खड्डा खणतो, तोच त्या खड्ड्यात पडतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.