राज्य सरकराने पगारवाढ आणि वेतनहमी या दोन मागण्यांबाबत निर्णय घेतल्यानंतर देखील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार काही एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईची भूमिका घेण्याचा विचार करत असताना विरोधकांकडून मात्र त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना टीका केली जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात औरंगाबादमध्ये बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही भरपूर मदत केली, पण…”

एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावर सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. “एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकराची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न सरकारकडून होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं. पण सरकारनं दोन पावलं पुढे यायला हवं, ते सरकार येत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

असंवेदनशीलतेचा कळस

या मुद्द्यावर सरकारची भूमिका म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. “काल मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा”, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

Video: “…अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू”, अनिल परब यांचा इशारा!

राज्य सरकारचं आवाहन

“एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे ४१ टक्के वाढ सरकारने दिली. यामुळे १० वर्षे ते ३० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ते ५६ हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा”, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. 

सत्तेच्या अहंकारात इतके मदमस्त राज्यकर्ते….

दरम्यान, नायर हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी देखील फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पण सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही. नायर हॉस्पिटलमध्ये कुणी बघायलाही गेलं नव्हतं. आमच्या आमदार, नगरसेवकांनी मांडला, तेव्हा यांना जाग आली आणि ते बघायला गेले. सत्तेच्या अहंकारामध्ये इतके मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत, जनता यांना माफ करणार नाही”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis slams thackeray government on st workers strike mesma act pmw
First published on: 04-12-2021 at 11:44 IST