मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबई दौऱ्यात युतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी राज ठाकरेंना भेटणार असल्याचंही बोललं जात आहे.

या सर्व घटनाक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत स्पष्ट संकेत देणारं विधान केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात बैठक होणार नसल्याचं सांगितलं आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे, ते यावेळी भाजपाची बैठकीलाही उपस्थित राहणार आहे, याव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही कार्यक्रम नाहीत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, “गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत येत असतात. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर काही घरगुती गणपतींना भेट देणार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. ते माझ्या घरीही येणार आहेत. याशिवाय ते मुंबईत येणार असल्याने त्यांनी मुंबईत भाजपा नेत्यांची एक बैठक घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. त्यासाठीही त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे. ते मुंबईत एका शाळेच्या उद्घाटनानिमित्ताने कार्यालयीन कामासाठी येणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

हेही वाचा- “रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे भाजपा -मनसे युतीसंदर्भात राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.