शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत हा वाद फक्त शिवसेना पक्षामध्येच सुरु होता. मात्र आता भाजपा अॅक्शन मोडमध्ये आला असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारला महुमत सिद्ध करायला लावावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. या सत्तानाट्यामध्ये भाजपाने उडी घेतलेली असताना भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे भाकित केले आहे. येणाऱ्या आषाढीला विठ्ठलाची पूज देवेंद्र फडणवीस हेच करतील. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र याला पर्याय नाही, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> सत्तासंघर्षांत भाजपची उडी; बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची राज्यपालांकडे मागणी

“महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार होईल अशी भावना सामान्य जनता तसेच भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढीला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील आणि तेच आषाढीची पूजा करतील. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र याशिवाय आता पर्याय नाही. कायदेशीर बाबींवर विचार झाला आहे. हा दोन गटांतील वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घातलं आहे. लवकरच हा विषय मार्गी लागेल,” असे विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात भाजपची ठोस पावले?; शहा, नड्डा, विधिज्ञांशी दिवसभर चर्चा

तसेच, “शिवसेनेचं अस्तित्व महाराष्ट्रात संपत आहे. जी स्वाभिमानी मंडळी आहेत ती एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने पुढे येत आहेत. राज्याला चांगलं सरकार देण्याची तयारी झाली आहे. भाजपा सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. विधानसभा निवडणुकीत जनाधार भाजपा आणि शिवसेनेला मिळाला होता. महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झाले होते. आता तेच विश्वासघाताबद्दल बोलत आहेत,” अशी खोचक टीकादेखील विखे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा >>> शब्द फिरवणाऱ्या भाजपबरोबर कसे जाणार?; संजय राऊत यांचा बंडखोरांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा घेतल्यानंतर मुंबईत परतताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून बहुमत चाचणी केली जावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार आशिष शेलार, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे अजूनही वेळ गेलेली नाही. परत या. समोर बसून चर्चा करुया, अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केली आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.