Dhananjay Munde Bell’s Palsy: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहेत. वाल्मिक कराडबरोबर असलेल्या संबंधांमुळे विरोधकांसह सत्ताधारी तर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अंजली दमानिया त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशात गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराने ग्रासले असून, त्यांना सलगपणे दोन मिनिटेही बोलता येत नाही. याबाबत मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

मला सलग दोन मिनिटेही…

बेल्स पाल्सी आजाराबाबत माहिती देताना आपल्या एक्स पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले, “माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही.”

धनंजय मुंडे पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “या आजारामुळे मला एक-दोन कॅबिनेट बैठकांना आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेल्स पाल्सी म्हणजे काय?

बेल्स पाल्सी म्हणजे अर्ध्या चेहऱ्यावरून वारे जाणे. या आजारात चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे आकुंचन-प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात. क्वचितप्रसंगी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात. मेंदूमधून एकूण १२ विशेष मज्जातंतू निघतात. त्यांना क्रेनिअर नव्‍‌र्हस म्हणतात. यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नव्‍‌र्ह म्हणतात. मेंदूपासून डोक्याच्या कवटीबाहेर आल्यावर या फेशियल नव्‍‌र्हला पाच शाखा फुटतात. त्या कपाळ, भुवया, पापण्या, वरचा आणि खालचा ओठ, गाल, कानाच्या पुढील भाग, मानेचा एका बाजूचा भाग यावरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात. या मज्जातंतूला इजा झाल्याने या स्नायूंच्या हालचाली बंद होतात. या आजाराबाबत लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या डॉ. अविनाश भोंडवे यांच्या लेखात वरील माहिती दिली आहे.