मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींमधील एकाने हत्येचा कट बीडच्या नेत्याने रचल्याची माहिती आपणास दिली, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

वारंवार हे आरोपी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होते. थेट मारून टाकण्याऐवजी परराज्यातील गाडी क्रमांक मिळवून अपघात घडवून आणण्यापर्यंतची चर्चा झाली असल्याचा दावा जरांगे यांनी पत्रकार बैठकीत केला. मारण्याच्या कटाचा व्यवहार अडीच कोटी रुपयांचा होता, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात माझ्यासह सर्वांची नार्को चाचणी करून सीबीआय मार्फत तपास करावा, असे मत धनंजय मुंडे यांनी उत्तरादाखल आयोजित पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

जालना पोलीस अधीक्षकांना मराठा आंदोलनातील कार्यकर्ते गंगाधर काळकुटे यांनी लिहिलेल्या तक्रारीत जरांगे पाटील यांच्या जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचून देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी, असे म्हटले हाेते. दादा गरुड आणि अमोल खुने अशी या दोन आरोपींची नावे काळकुटे यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात दिली आहेत. या पत्रात एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचे नमूद केले होते.

गुरुवारी रात्री उशिराने गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा कट रचण्याच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दादा गरुड व अमोल खुने यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

माझ्यासह जरांगे व आरोपींचे ब्रेन मॅपिंग करा

जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्यानंतर मुंडे यांनीही पत्रकार बैठक घेऊन त्यास प्रतिउत्तर दिले. मुंडे म्हणाले, माझी आणि मनोज जरांगे यांच्यासह या प्रकरणातील आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को चाचणी घ्यावी. हे तुम्हाला सगळं महागात पडेल, असा इशाराही मुंडे यांनी दिला.