बारामतीसाठी येत्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरादार प्रचार केला जात आहे. पुरंदरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या अजित पवार गटाच्या प्रचारसभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच, बारामतीचा विकास सुनेत्रा पवार सून म्हणून आल्यानंतरच सुरू झाला, असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून टीका-टिप्पणी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मात्र, त्याचवेळी पुढील टप्प्यांसाठीचा प्रचार सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार असून त्यात बारामतीचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघ प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

धनंजय मुंडेंनी यावेळी सुनेत्रा पवार या पवार कुटुंबाच्या सून असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. “घरी सून आली तरी आपण तिला लेक मानतो या शिकवणीचा या निवडणुकीत विसर पडायला लागला आहे. या निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवायचंय की एका परिवाराचं भवितव्य ठरवायचं हे आपल्याला नक्की करावं लागेल”, असं ते म्हणाले. “इतरांना अनेकदा संधी दिली आहे. एकदा सुनेत्रा ताईंना संधी देऊन बघा. २०१२पासून १४ हजार महिलांना रोजगार पुरवला आहे. सुनेत्रा ताईंच्या विरोधातील उमेदवारानं किती लोकांना रोजगार पुरवला हे सांगावं”, असा प्रश्न मुंडेंनी सुप्रिया सुळेंना केला.

“टीएमसीचं लिटरमध्ये सांगता येईल का?”

दरम्यान, यावेळ धनंजय मुंडेंनी सुप्रिया सुळेंना खोचक शब्दांत टोला लगावला. “इथे विजय शिवतारे एकेक टीएमसी पाण्याचा हिशेब करत आहेत. पण समोरच्या उमेदवार जरी संसदरत्न असल्या तरी टीएमसी-एलएमटीचं लिटरमध्ये सांगता येईल का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.

“अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य घडू शकतं”, ईव्हीएम बंद पडल्यामुळे संजय राऊतांचा संशय; म्हणाले, “अचानक सायंकाळी…”

“मराठवाड्याची लेक बारामतीत सून म्हणून आली आहे. काहींनी घरच्या सुनेला बाहेरचं म्हटलं. पण मतदार तरी स्वीकारतील. एखाद्याचं पोटचं आहे म्हणून झाली असेल चूक. ठीक आहे. पण मतदारांकडून अशी चूक व्हायला नको”, अशा शब्दांत मुंडेंनी शरद पवारांनाही टोला लगावला.

“…तेव्हापासून बारामतीचा विकास सुरू झाला”

“अजित पवारांचा विवाह १९८५ साली झाला. जेव्हा सून म्हणून सुनेत्रा पवारांचे पाय बारामतीला लागले तेव्हापासूनच विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली”, असा दावा धनंजय मुंडेंनी यावेळी केला.

“अजित पवारांनी गद्दारी केली असं बोललं गेलं. आम्ही जर काही बोललं की लगेच म्हटलं जातं की यांची लायकी आहे का शरद पवारांवर टीका करण्याची? शरद पवार आजही आमच्यासाठी दैवत आहेत, आदरणीय आहेत. जाणते राजेच आहेत. पण आज ही काय वेळ आली आहे? जाणत्या राजाला घर नसतं, पोर नसतं, बाळ नसतं. सर्व रयता त्याची कुटुंब असते. पण आज मात्र त्या जाणत्या राजाा रयत व कुटुंब यातली निवड करावी लागते ही वेळ आली”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०१४ ला केलं ते संस्कार आणि अजित पवारांनी केलं ती गद्दारी? २०१७ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुणाच्या घरी कशी बैठक झाली, दिल्लीत कुणाच्या घरी चर्चा झाली, त्यात शिवसेनेला बाजूला कसं काढायचं यावर कशी बोलणी झाली हे मी तारखेसहीत सांगू शकतो. पण ते संस्कार होते, आम्ही मात्र गद्दार. मी उद्धव ठाकरेंची कमाल मानतो. एवढा हतबल झालेला माणूस मी कधी पाहिला नाही. त्यांच्यासमोर हे नेते स्पष्टपणे सांगतात की शिवसेनेला आम्ही भाजपापासून बाजूला केलं ही आमची चाल होती आणि उद्धव ठाकरे हसत आहेत. किती हतबलता आहे ही? ते संस्कार होते का?” असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.