बीड : परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानकडून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती येथे देण्यात आली. दरवर्षी प्रतिष्ठानकडून दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असून, गतवर्षीचा महोत्सव मायानगरीतील अनेक प्रख्यात तारका, संगीतकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आल्याने चर्चेत असतो. यंदा मात्र, धनंजय मुंडे यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागासारखे महत्त्वाच्या मंत्रिपदावरून पायउतार होण्यासारखे ‘विघ्न’ कोसळल्याने कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नसल्याची चर्चा सुरू आहे.

मागील पाच वर्षांपासून धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर होते. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रिपदी राहिलेले होते. तर गतवर्षातील डिसेंबरमध्ये अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. हे मंत्रिपद त्यांच्यासाठी औटघटकेचे ठरले.

अवघ्या साडेतीन महिन्यांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. या दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसारख्या समर्थकाचे प्रमुख आरोपी म्हणून नाव पुढे येणे, करुणा मुंडे पोटगी प्रकरणातही निकाल विरोधात जाणे, डोळ्यांवरील शस्त्रक्रिया, बेल्स पाल्सीसारखा आजार अशा पाठोपाठ आलेल्या ‘विघ्नां’ची मालिकाच मुंडेंच्या जीवनात सुरू झाली होती.

यंदाच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याचा जिवंत देखावा साकारला जाणार आहे. यामुळे नाथ प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवाचे स्वरूप बदललेले दिसून येत आहे. गत वर्षीच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात पुष्पा चित्रपटतील अभिनेत्री रश्मिका मंदाना, दूरदर्शवरील रामायण मालिकेतील सीता, सिनेअभिनेत्री क्रिती सनॉन, गायक कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, खासदार तथा अभिनेत्री हेमामालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांची आपल्या कलेचे सादरीकरण केले होते.

शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकट पाहून नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यावर्षी अभिनव पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ज्ञानेश्वरकालीन संदर्भांचे देखावे साकारण्यात आले आहेत. – अनंत इंगळे, सहसचिव, नाथ प्रतिष्ठान.