भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. भाजपा नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यानिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. ज्यांच्याशी संवाद साधता येईल, राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा एकही नेता आज भाजपात दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणारी पोस्ट चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अप्पा… तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. स्व. अप्पांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन…” असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील वडील गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. “लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त ‘संकल्प सेवेचा’, ‘सेवा यज्ञ’ उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. तसेच ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवारांचे कोविड लसीकरण करून घेतले,” असे त्यांनी ट्वीट करून सांगितले.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनाला संघर्षदिन म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde tweet on gopinath munde birth anniversary hrc
First published on: 12-12-2021 at 16:54 IST