Dhananjay Munde Participated Banjara Protest in Beed for Reservation Under ST : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजातील हजारो लोकांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) बीड व जालन्यात मोर्चे काढले. बीडमधील मोर्चाला आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुंडे यांनी भाषणही केलं. मात्र, या भाषणावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. तसेच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी भाषणातून उपस्थित केला होता.
मुंडे यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजातील अनेकांनी आक्षेप नोंदवला असून मुंडे यांना त्यांचे शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच मुंडे यांचं भाषण चालू असतानाच बंजारा समाजातील मोर्चेकऱ्यांनी विरोध केला. धनंजय मुंडेंविरोधात घोषणा देखील दिल्या.
धनंजय मुंडेंचा यू-टर्न
दरम्यान, “वंजारी व बंजारा या जाती वेगळ्या आहेत” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कालच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. “बंजारा समाजाने भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम केलं आहे. त्याच भावनेतून मी ते वक्तव्य केलं होतं”, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. तसेच दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
“बंजारा व वंजारी या जाती म्हणून वेगवेगळ्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असताना बंजारा समाजाने त्यांच्यावर खूप प्रेम केलं. त्या परिस्थितीत मी ते वक्तव्य केलं. आता त्याचा कोणी काय अर्थ घ्यावा तो ज्याचा त्याचा प्रश्न. घोषणा देणारे कोण होते ते समाजमाध्यमांद्वारे बाहेर आलंच आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही.”
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले होते?
धनंजय मुंडे बीडमधील भाषणात म्हणाले होते की “बंजारा समाजाला तेलंगणात एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात आरक्षण दिलं आहे. राजस्थानातही एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आम्हीसुद्धा राजस्थानात एसटीच आहोत. त्यामुळे बंजारा-वंजारी वेगळे आहेत का?”