छत्रपती संभाजीनगर : बाजार समिती, सिमेंट कंपन्या, बांधकाम क्षेत्र आदी ठिकाणी ओझेदार गोण्या पाठीवर वाहवत नेऊन वाहनात रचणे किंवा रिकामे करण्यासारखे हमाल, मजूर, कष्टकऱ्यांचे श्रम हलके करणारे यंत्र धाराशिवमधील एका ७७ वर्षीय शेतकऱ्याने तयार केले आहे.
या शेतकऱ्याचे शिक्षण जुन्या काळातील केवळ सातवीपर्यंत झालेले असून, नवनवीन कल्पनांचा ध्यास घेऊन निर्मिती करण्याच्या छंदातून तयार केलेल्या या यंत्राची दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रात्यक्षिकासह चाचणी घेण्यात आली. हाताळायला सुलभ, श्रममुक्ती देणारे आणि बेरोजगारांनाही व्यवसायासाठी पूरक ठरणारे हे यंत्र असल्याचा दावा शेतकरी गुरुलिंग स्वामी यांनी केला आहे.
धाराशिवपासून २० किलोमीटर अंतरावरील समुद्रवाणी-लासोना येथील रहिवासी असलेले गुरुलिंग स्वामी हे मूळचे शेतकरी. गावात त्यांच्या वाटेची २५ एकर जमीन आहे. दोन मुलं, चार मुली असा त्यांचा परिवार असून, ते सर्व विवाहित आहेत. शेतीत स्वामी यांचे वेगवेगळे प्रयोग चालत असतातच. शेतकऱ्यांच्या जीवाला पडणारे कष्ट कमी करण्याचा त्यांचा एक पिंड तयार झालेला असून, त्यातूनच त्यांनी यापूर्वी ऊस तोड कामगारांचेही श्रम कमी करणारे यंत्र तयार केलेले आहे.
ऊसाच्या फडातून मोळ्या थेट ट्रकमध्ये रिचवणारे हे यंत्र साधारण आठ वर्षांपूर्वी तयार केलेले आहे. त्याच्याही आधी तेरणा नदी पात्रातील माती व वाळू यांचे मिश्रण स्वतंत्र करण्यासाठी वाळू धुण्याच्या येणाऱ्या यंत्राची निर्मिती केली आहे. माती-वाळूच्या मिश्रणामुळे त्याचा वापर शेतीसाठी व्हायचा, ना बांधकामासाठी. यातूनच वाळू धुण्याचे यंत्र तयार करण्याची संकल्पना सूचली व यंत्र साकारण्यात आले. याशिवाय विंधन विहिरीतील कपलिंग काढण्याचेही यंत्र तयार केले असून, ते महाराष्ट्रातील पहिले यंत्र ठरल्याचा गुरुलिंग स्वामी यांचा दावा आहे.
हमाल कामगारांचे श्रम कमी करण्याच्या उद्देशातून संशोधन आणि कल्पकता वापरून महिन्याभरात एका यंत्राची निर्मिती केली. एका पट्ट्यावरून वजनदार पोते ट्रकमध्ये नेता-उतरवता येणाऱ्या या यंत्राचे वजन एक टन आहे. दोन चाके असल्याने ते दोन माणसे अन्य ठिकाणी नेऊ-आणू शकतात. यंत्रासाठी अडीच लाख खर्च आला आहे. ३ अश्वशक्तीचा (एचपी) पंप असून, त्यासाठी वीजही कमी लागते. कुठलाही दुरुस्तीचाही खर्च नाही. – गुरुलिंग स्वामी, समुद्रवाणी-लासोना.