बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि दोन भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण आता पंकजा मुंडेंशी असलेला राजकीय संघर्ष संपला असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बीडमधील नागरिकांसाठी हा मुद्दा राजकीय चर्चेचा ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही भावंडांमध्ये असणारा राजकीय वर्चस्वाचा वाद आता संपल्याचं खुद्द धनंजय मुंडेंनीच जाहीर केल्यामुळे आता दोघेही आगामी काळात एकत्र महायुतीचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे.
शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला योग!
बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजि पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण त्यांच्यासमवेतच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भगिनी, तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे याही एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनीही एकमेकांचा उल्लेख करत एकत्र बीडचा विकास करण्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला. यानंतर धनंजय मुंडेंनी टीव्ही ९ शी बोलताना दोघांमधले मतभेद संपुष्टात आल्याचं जाहीर केलं.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंशी असलेले मतभेद मिटल्याचं नमूद केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा व शिवसेनेसोबत सरकारमध्ये आल्यानंतर आमच्यात जो काही राजकीय संघर्ष होता तो संपला. ते मनभेद नव्हते, राजकीय मतभेद होते. राजकारणात त्या वेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात विचारांनी वेगळे होतो. आता महायुतीच्या माध्यमातून हे सर्व विचार एकत्र आल्यानंतर आमच्या बहीण-भावामध्ये अंतर पडायचं कारण नाही. आम्ही याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. पण ज्या मजबुतीने जिल्ह्याचं नेतृत्व व्यासपीठावर आज पाहायला मिळालं, त्याचा आनंद सगळ्यांनाच होता”, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
“व्यासपीठावर जिल्ह्याचं नेतृत्व एकत्र आल्याचा आनंद पंकजा ताईंनाही होता व मलाही होता. या पंचक्रोशीतल्या अनेकांना असं वाटतं की आम्ही दोघांनी आधी जसं एकत्र काम करत होतो, तसंच एकत्र काम करावं”, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.