अपंग श्रेणीत १५ नवीन व्याधींचा समावेश

राज्यात आधी सहा प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जायचे. आता मात्र, केंद्र व राज्य शासनाने यात बदल केले असून नव्या १५ व्याधीग्रस्तांनासुद्धा दिव्यांगत्वाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता २१ प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६  संमत केले असून तशा मार्गदर्शक सूचनाही राज्यांना पाठवल्या आहेत. यानुसार आता सिकलसेल, थॅलेस्मिया, हिमोफेलिया व कुष्ठरुग्णही दिव्यांग श्रेणीत मोडणार आहेत. याकरिता दिव्यांगांना ओळखपत्र अतिशीघ्र मिळावे, यासाठी  केंद्र शासनाचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वी राज्यात सॉफ्टवेअर अ‍ॅसेसमेंट फॉर डिसॅबिलिटी या संगणकीय प्रणालीद्वारे दृष्टिदोष, दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता या सहा प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तींनाच दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. आता केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती व हक्क अधिनियमानुसार नव्याने १५ आजारांचा दिव्यांग श्रेणीत समावेश केला आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा शल्यचिकित्सक एन.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, २१ प्रकारच्या दिव्यांगांना याचा लाभ होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने ५० दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड दिले असून त्यांना याचा शासकीय नोकरीत तसेच अन्य ठिकाणी लाभ होणार आहे.

या रुग्णांना लाभ मिळणार

शारीरिक वाढ खुंटणे (डॉर्फिझम), स्वमग्नता (ऑटिझम), मेंदूचा पक्षाघात,  स्नायूची विकृती (मस्क्युलर डिस्ट्रॉफी), मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्केरॉयसीस, वाचा व भाषा दोष, अ‍ॅसिड अ‍ॅटक पीडित, पार्किन्संस, दृष्टीक्षीणता (लो-व्हिजन), सिकलसेल, थॅलेसेमिया, हिमोफेलिया व कुष्ठरोग.