मोहनीराज लहाडे, लोकसत्ता
नगर: शिवसेनेत राज्यस्तरावर निर्माण झालेल्या दुफळीची लागण नगर शहरापर्यंत येऊन ठेपली असली तरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला फारसे समर्थन मिळताना दिसत नाही. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोषाचा भडका उडाला आहे. शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी आणि नगरसेवक संपर्कप्रमुखांना हटवण्याची जाहीरपणे मागणी करत आहेत. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेण्यात येत आहेत.
संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल शहरातील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्याबद्दलच्या तक्रारी यापूर्वीही वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात आल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आता या मोहिमेने पुन्हा उचल खाल्ली आहे . शिवसेनेचे आमदार फुटले त्यावेळी शहरातील ठाकरे समर्थकांनी त्यांचा निषेध करत प्रतीकात्मक पुतळय़ांचे दहन केले. याच आंदोलनात संपर्कप्रमुख कोरगावकर यांच्याही पुतळय़ाचे दहन करण्यात आले. त्यानंतर ठाकरे समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याच्या बैठकीत महिला पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी कोरगावकर यांच्या तोंडावरच त्यांना हटवण्याची मागणी केली.
कोरगावकर हे राष्ट्रवादीच्या आमदाराशी साटेलोटे करतात, त्यांना अनुकूल भूमिका घेतात. त्यांच्यामुळे नगर शहरातील संघटना खिळखिळी झाली आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, महापालिकेतील सत्तेसाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात शिवसेनेतील नगरसेवकांचा विरोध होता, तरीही कोरगावकर यांच्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची भूमिका घेतली गेली, असे आरोप जाहीरपणे करण्यात आले. कोरगावकर यांनी मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांशी संबंध असल्याचे दाखवा; संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देतो. पक्षप्रमुखांनी आपली संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे, ते सांगतील तोपर्यंत आपण काम पाहू, अशी भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे गेल्या आठवडय़ात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिर्डी दौरा केला. त्यावेळी नगर शहरातील युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. या भेटीत कोरगावकरांबद्दल तक्रारी करण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांनी शिष्टमंडळाला मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार शिष्टमंडळ मंगळवारी सेनाभवनात भेटले. तेथे कोरगावकर हटवण्याची मागणी करण्यात आली. त्याबद्दलचे काही पुरावेही आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले.
जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांचा फारसा संपर्क आला नाही. मात्र नगर शहरात शिवसेनेचे तीन महापौर करण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यातूनच माजी महापौर शीला शिंदे यांचे पती व ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक संभाजी लोंढे, संग्राम शेळके, माजी नगरसेवक सचिन जाधव, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, बसपाचे नगरसेवक अक्षय उनवणे, माजी नगरसेवक काका शेळके, अनिल लोखंडे, छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश फुलारी यांनी शिंदे समर्थन दिले आहे. तर जिल्हाप्रमुखांचे चिरंजीव व नगरसेवक योगीराज गाडे यांनी नंतर आपण खासगी कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो, मात्र त्यांना समर्थन दिलेले नाही, अशी भूमिका घेतली. समर्थकांचा गट आता अधिकाधिक नगरसेवकांचे समर्थन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला महापौरांविरुद्धच्या नाराजीचीही जोड दिली जात आहे.
