श्रीवर्धन: दिवाळी सण काही तासांवर आला असून श्रीवर्धन बाजारपेठ विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सजली आहे.बाजारपेठेत विविध रंगाचे,विविध आकारांचे आकाश कंदील विक्रीला आले आहेत.विक्रेत्यांनी रंगीबेरंगी पणत्या,रांगोळी,आकाश कंदील,घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत.या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व असल्याने बाजारात  लाल मातीच्या व डेकोरेटिव्ह पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.खरेदीसाठी ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी होत असून,वेगवेगळ्या आकाराचे,रंगांचे आकाश कंदील,फटाके खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

विद्युत रोषणाईच्या माळां बरोबर पणत्या,समई विक्री करीता उपलब्ध आहेत.विविध रंगाच्या रांगोळ्यांची विक्री यावेळी वाढली आहे.रांगोळीचे रंग,पोस्टर रांगोळीचे रंग, रांगोळी काढण्यासाठी वापरण्यात येणारे साचे बाजारात विक्रीसाठी आहेत.दिवाळीत पणत्यांना विशेष महत्त्व असते.यंदा बाजारात पणत्यांचे विविध प्रकार आले असून,त्यात मेणा पासून तयार केलेल्या व पाण्यावर तरंगणार्या गुलाब,जास्वंद फुलांच्या आकारातील पणत्या आणि फॅन्सी व लाल मातीच्या पणत्यांची बाजारात चलती आहे.विजेवर चालणाऱ्या पणत्याही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटक्यांची आतषबाजी केली जाते.प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक,वाणी आळी,टिळक रस्ता या मार्गांवर दुकान दिसून येत आहे.फटाक्यांच्या किंमतीही काही प्रमाणात वाढल्या असल्या तरी ग्राहकांकडून टिकली केपां पासून रंगीत व आकर्षक फटाक्यांची मागणी होत आहे,असे फटका विक्रेते सावन तवसाळकर यांनी सांगितले.

आकाशकंदील,पणत्यांसह किल्ल्यांवर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज,मावळे,तोफा यांच्या प्रतिकृती तसेच विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय.नागरिकांनी चायना मेड वस्तूंकडे पाठ फिरवली असून भारतीय बनावटीच्या वस्तूंना ग्राहक प्राधान्य देत असल्याची माहिती व्यवसायिक रूपेश तिताडे यांनी दिली.दिवाळी फराळाची आगाऊ नोंदणी हाॅटेल,महिला गृह उद्योग, महिला बचत गट मार्फत सामाजिक माध्यमातून होत आहे.अनेक महिलांनी आयते फराळ न मागवता घरीच फराळ करण्यास सुरूवात केली आहे.

चिरांट नामषेश होण्याच्या मार्गावर

नरकचतुर्दशीच्या दिवसाला  अभ्‍यंगस्‍नाना अगोदर डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरांट नावाचे कडू फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आहे.या कडू फळाच्या रूपात नरकासुराचा प्रतीकात्मक वध करीत कटुता,दुष्टता नाहीशी व्हावी,अशी प्रार्थना केली जाते.जंगल परिसरात वेलींवर उगवणारे चिरांट फळ हे सद्यस्थितीत जंगले उध्वस्त होत असल्याने नामषेश होत आहे.