अहिल्यानगर: जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात ‘ब्राव्हो’ हा नवीन श्वान दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी डॉबरमन जातीच्या नर श्वानाचे ‘ब्राव्हो’ असे नामकरण केले. जिल्हा पोलीस दलातच्या श्वान पथकात एकूण ७ श्वानांचा समावेश आहे.

आज दाखल झालेला ब्राव्हो सध्या ४६ दिवसांचा आहे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला पुणे किंवा हरियाणा येथे ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचा वापर गुन्हे शोधण्यासाठी केला जाणार आहे. त्यादृष्टीने त्याला प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पथकातील श्वान हस्तक तथा पोलीस अंमलदार उमेश गोसावी यांनी सांगितले.

यापूर्वी श्वान पथकातील गुन्हे शोध घेणारी ‘रक्षा’ ही डॉबरमन जातीची मादी श्वान गेल्या फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाली. सध्या गुन्हे शोध पथकात सीमा या आणखी एका श्वानाचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी एकूण ७ श्वानांचे पथक मंजूर आहे. त्यातील गुन्हे शोधासाठी दोन, बॉम्ब किंवा स्फोटके शोधासाठी दोन, अमली पदार्थांच्या शोधासाठी एक व शिर्डी येथील साई मंदिराच्या सुरक्षेसाठी दोन अशा एकूण ७ श्वानांचा समावेश आहे.

ब्राव्हो श्वानास पुण्यातील पेट क्लबमधून आणण्यात आले आहे. तो सहा महिन्यांचा झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. प्रशिक्षित श्वान पथकात साधारण दहा वर्षे कार्यरत ठेवला जातो. पोलीस दलात श्वान पथकाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रशिक्षणानंतर पथकातील श्वानांनी गुन्हे उघडकीस आणण्यात, गुन्हेगारांचा मार्ग शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हेगारांच्या बदलत्या कार्यपद्धतीप्रमाणे श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. त्या आधारावर श्वान गुन्हेगारांचा मार्ग काढतात. श्वानांच्या वास ओळखण्याच्या तीव्र क्षमतेचा यामध्ये वापर करून घेतला जातो. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा मेळावा अशा कार्यक्रमापूर्वी परिसराची श्वान पथकामार्फत स्फोटकांच्या शोधासाठी तपासणी केली जाते. पथकातील श्वानांच्या हाताळणीसाठी विशेष प्रशिक्षण असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला जातो.

नगर जिल्हा पोलीस दलात दाखल केलेल्या ब्राव्हो याचा जन्म ज्या श्वानांपासून झाला आहे ते श्वान अखिल भारतीय श्वान स्पर्धेतील विजेते ठरलेले आहेत. श्वानांमधील डॉबरमॅन जातीची तीव्र स्मरणशक्ती, वास ओळखण्याची तीव्र क्षमता, चपळ हालचाली, दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याची धारणा, धाडसीपणा अशी वैशिष्ट्ये, सांगितले जातात.