सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते (कै.) गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. कसलाही डामडौल न दाखवता ते अगदी साध्या एसटी बसनेही प्रवास करायचे. याच आदर्श शिकवणीतून नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी श्रीमंतीचे प्रदर्शन न करता, थाटमाट, डामडौल बाजूला ठेवून साध्या पद्धतीने विवाह केला आहे. त्याची सकारात्मक चर्चा होत आहे.
गणपतराव देशमुख यांच्याकडे राज्यभर साधेपणाने जगणारा नेता असे आदराने पाहिले गेले. राजकीय तडजोडी न करता वैचारिक आणि तात्त्विक भूमिका घेऊन त्यांनी राजकारण आणि समाजकारणात ठसा उमटवला होता. त्यांचा हा वारसा कुटुंबीयांनी चालविला आहे.डॉ. अनिकेत यांनी सर्व अनिष्ट गोष्टींना फाटा देऊन आपला विवाह साध्या पद्धतीने केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथील डॉ. आस्था हणमंत साकाळ-पाटील यांच्याशी त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या वेळी आजी रतनबाई देशमुख व अन्य मोजक्या नातेवाइकांशिवाय अन्य कोणी हजर नव्हते.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत शेकापकडून सांगोला येथून उमेदवार होते. शिवसेनेच्या ॲड. शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना ७६८ मतांनी पराभूत व्हावे लागले. सांगोला तालुक्यातील सर्व सत्तास्थाने दिमतीला असूनही देशमुख घराण्याने विवाहसोहळ्यात साधेपणा जपला. मंडप, वाजंत्री, वरात, जेवणावळी आणि भपकेबाजीला कोठेही थारा दिसून आला नाही. डॉ. अनिकेत देशमुख हे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. ते शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत आहेत. तर त्यांची जोडीदार डॉ. आस्था यादेखील सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत.
वैद्यकीय सेवा करीत असताना वैवाहिक जीवनासाठी जोडीदार भेटला. लग्न करताना श्रीमंतीचे प्रदर्शन, डामडौल या गोष्टी मनाला शिवल्या नाहीत. डॉ. आस्था यांचाही विचार तसाच होता. आजोबांच्या शिकवणीचा वसा आम्ही देशमुख कुटुंबीय पुढे घेऊन जात असताना विवाह साध्या, नोंदणी पद्धतीने केला आहे.डॉ. अनिकेत देशमुख