कराड : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सुपीक व नापीक जमिनीचे माती परीक्षण करून भावी उत्पादने घ्यावीत, शास्त्रोक्त पद्धतीने सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतल्यास भारत निर्यातक्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल, इच्छाशक्ती अन् शेतकऱ्यांनी ठरवलं तर भारत निश्चितच महासत्ता होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केला.
मसूर (ता. कराड) ग्रामपंचायतीत रसायन तंत्रज्ञान मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व लिमये सार्वजनिक वाचनालय यांच्या विद्यमाने ‘आधुनिक शेती तंत्रज्ञान’, बायोकार्बन प्रात्यक्षिक व व्याख्यान तसेच विक्रमी सोयाबीन उत्पादनासाठी हंगाम प्रशिक्षण शेतकरी मेळाव्यात डॉ. जोशी बोलत होते. वसंतराव जगदाळे, मानसिंगराव जगदाळे, संग्राम घोरपडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, भारताचा कणा असलेली शेती शाश्वत आहे, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रोक्त पद्धतीने सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतल्यास भारत निर्यातक्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल, पाच गावे एकत्रित आल्यास धनकचरा व्यवस्थापनातून त्या पाच गावांना गॅस निर्मिती होऊ शकते, असा विश्वास त्यांनी दिला.
भारत हा विविध मौलिक खनिजे व खजिन्यांचा देश आहे. त्याच्या विविधांगी शोधातून नावीन्यपूर्ण संकल्पना अस्तित्वात येऊ शकतात, त्यासाठी इच्छाशक्ती हवी, भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य दिशा, ज्ञान व शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळाल्यास भारत उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण महासत्ता बनेल. मात्र, आपला भर परदेशी वस्तूंवर आकर्षित होतो, हे चुकीचे आहे. शेतकऱ्यांनी गट शेतीला प्राधान्य द्यावे, १० शेतकऱ्यांचा गट केल्यास त्यात आम्ही नावीन्यपूर्ण प्रयोग करून यशस्वी उत्पादने कशी घेता येतील, याची प्रात्यक्षिके दाखवू. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास हे उत्पादित अन्नधान्य सहापटीने कसे पिकवू शकतो, हे पटवून दिले. प्रा. विजय बढे, प्रा. बालकृष्ण जमदग्नी, प्रा. बी. पी. पाटील, दीपक वांगीकर यांचेही अभ्यासपूर्ण मनोगत झाले.