सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या ठिकाणी अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कारभार डॉ. ऋत्विक जयकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डॉ. संजीव ठाकूर हे यापूर्वी २०२१ ते २०२३ दरम्यान करोना महामारीच्या काळात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात, ससून रुग्णालयात अधिष्ठातापदी झाली असता त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांची बदली एक वर्षापूर्वी पुन्हा सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली होती. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महाविद्यालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. ऋत्विक जयकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्वेतांभरी खडे यांनी तसा आदेश काढला आहे.
डॉ. जयकर यांचे वैद्यकीय शिक्षण याच डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते. नंतर याच महाविद्यालयात शल्यचिकित्सक विभागाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत असताना त्यांना आता अधिष्ठातापदाचा अतिरिक्त भार सांभाळण्याचा मान मिळाला आहे.