Dr Shirish Valsangkar Suicide Case : सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (७०) यांनी आपल्या मोदीखान्यातील निवासस्थानी पिस्तुलाद्वारे गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. डॉ. वळसंगकरांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण आता समोर आलं आहे. पोलिसांना डॉ. वळसंगकरांची सुसाइड नोट मिळाली असून यामध्ये एका महिलेचा उल्लेख आहे, जी त्यांना धमाकवत होती. तिच्या धमक्यांना कंटाळूनच डॉक्टर वळसंगकरांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाइड नोटमधून स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या आरोपी महिलेस अटक केली असून आज तिला सोलापूर न्यायालयासमोर हजर केलं होतं.

संबंधित महिलेवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. हा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून ती महिला कर्मचारी डॉ. वळसंगकर यांना सतत धमकावत होती, असा आरोप आहे. या धमक्यांना कंटाळून वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटवरून समोर आलं आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपी महिलेला आज सोलापूर सत्र व दिवाणी न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी न्यायमूर्तींनी आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात काम करत होती. वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयात नोकरीस होती. तिथे तिने काही आर्थिक गैरव्यवहार केले होते. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी मनीषा माने हिची ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी मनीषा माने हिच्याबरोबर या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत. पोलीस आता माने हिची चौकशी करतील. अशी माहिती या प्रकरणातील वकील प्रशांत वनगिरी यांनी दिली आहे.