“आपल्या देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. दर्जेदार शिक्षणाची सर्वांना संधी मिळणं हे महत्त्वाचे आहे. पण आज तथाकथित गुणवत्तेच्या नावाखाली गरीब, दलित, आदिवासी, मुस्लीम यांचा शिक्षणातील प्रवाह रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे,” असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ते रविवारी (४ जून) अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, “गुणवत्तेपेक्षा समानतेचा विचार महत्त्वाचा आहे. भारतात २००० वर्षांपासून जात आधारित शिक्षण व्यवस्था होती. त्यामुळे दलित, मागास जाती यांना शिक्षणाच्या संधी नाकारल्याने मागे राहिल्या. त्यांच्यामध्ये गुणवत्ता नव्हती म्हणून त्यामागे राहिलेल्या नाहीत. ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षण देण्यास नकार दिला तेव्हा भारतातील तथाकथित उच्चवर्णीयांनी गुणवत्तेपेक्षा भारतीयांना शिक्षणात समान संधी मिळावी अशी मागणी केली होती. आज देश स्वतंत्र झाल्यानंतर हेच तथाकथित उच्चवर्णीय गुणवत्तेच्या बाजूने आणि समान संधीच्या विरोधात बोलत आहेत.”

“भारतातील ५४ टक्के शैक्षणिक क्षेत्र खासगी संस्थांच्या ताब्यात”

“आज भारतातील ५४ टक्के शैक्षणिक क्षेत्र खासगी संस्थांच्या ताब्यात आहे. त्यातच १०० परदेशी विद्यापीठे भारतात येणार आहेत. या सर्वांमुळे गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सरकारने ‘आमच्या कडे शिक्षणासाठी पैसे नाहीत’ हा बहाणा करून शिक्षण क्षेत्र खासगी, परदेशी संस्थांच्या ताब्यात देणे हे आपल्या देशासाठी, देशातील गरीब, दलित, आदिवासी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे,” असं मत सुखदेव थोरात यांनी व्यक्त केलं.

“देवानेच जाती निर्माण केल्याचे धार्मिक संस्कार रुजविण्याचा डाव”

“आजच्या शिक्षणपद्धतीमधून डार्विनचा ‘उत्क्रांती सिध्दांत’ काढून तेथे ईश्वरचा ‘निर्मिती सिध्दांत’ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे हे जग उत्क्रांत झाले नसून देवानेच निर्माण केले आहे. देवानेच जाती निर्माण केल्या असे चूकीचे धार्मिक संस्कार रुजविण्याचा डाव आहे,” असा आरोपही सुखदेव थोरात यांनी केला.

“समाजातील वर्चस्ववादी वर्गाच्या सोयीनुसार गुणवत्तेचे निकष”

या विशेषांकाचे संपादक आणि जेष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी म्हणाले, “समाजशास्त्रज्ञांच्या मते गुणवत्तेच्या कल्पना तसेच निकष हे त्या त्या समाजातील वर्चस्ववादी वर्गाच्या सोयीनुसार केलेले असतात. वर्चस्ववादी वर्गाने प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी केलेल्या त्या क्लुप्त्या असतात. सध्याचे गुणवत्तेविषयीचे निकष हे त्या क्लुप्त्यांपैकीच आहेत.”

“आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो याचा पुरावा उपलब्ध नाही”

“आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो या गृहीतकाच्या मुळाशी ‘गुणवत्ता’ या बाबींवर केवळ उच्चवर्णीय जातींचा मक्ता आहे, हे गृहीतक आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारप्राप्त अभिजित बॅनर्जी आरक्षणासंदर्भात म्हणतात की, आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो याचा अद्यापपर्यंत कोणताही पुरावा उपलब्ध नाही,” असंही नानावटी यांनी सांगितलं.

हेही वाचा : अभ्यासक्रमातून उत्क्रांती सिद्धांत काढण्यास महा. अंनिसचा विरोध, निषेध करत ‘या’ अभियानाची घोषणा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णा कडलास्कर यांनी चळवळीचं गाणं सादर केलं. वक्त्यांची ओळख मुक्ता दाभोलकर यांनी करून दिली. सुत्रसंचलन राहुल थोरात, तर आभार राजीव देशपांडे यांनी मांडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sukhdev thorat comment on quality merit reservation in anis program pbs
First published on: 04-06-2023 at 21:32 IST