सावंतवाडी : गोव्यातील राजकीय दबावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारी एमआरएफ टायर कंपनीची नोकरभरती रद्द झाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या शेकडो स्थानिक तरुणांची निराशा झाली आहे. सुमारे २५० तरुणांना रोजगार देणाऱ्या या भरतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पुढाकार घेतला होता. ही भरती कुडाळ येथे होणार होती.

​गोव्याचा तीव्र विरोध:

ही भरती होणार असल्याची माहिती मिळताच, गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई आणि आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांच्यासह अनेक गोव्याच्या राजकीय नेत्यांनी याला जोरदार विरोध केला. “स्थानिक गोमंतकीय तरुणांना सोडून बाहेरील तरुणांना नोकऱ्या का दिल्या जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोव्याच्या नोकऱ्यांवर सिंधुदुर्गमधील तरुणांचा डोळा आहे. या वाढत्या राजकीय विरोधामुळे कंपनीवर दबाव आला आणि त्यामुळे कंपनीने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.

​सिंधुदुर्गमधील तरुणांची निराशा:

​सिंधुदुर्ग आणि गोवा हे भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्या संख्येने तरुण रोजगारासाठी गोव्याला जातात. त्यातही पर्यटन आणि इतर उद्योगांमध्ये ते काम करतात. एमआरएफची भरती सिंधुदुर्गमध्येच आयोजित झाल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला होता, पण आता भरती रद्द झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कंपनीकडून आलेला अधिकृत ईमेल दाखवून ही बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले. याआधी कंपनीने ही बातमी ‘फेक न्यूज’ असल्याचे म्हटले होते.

​सिंधुदुर्गमधील रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:

​या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कुडाळ आणि आडाळी (दोडामार्ग) येथे एमआयडीसी असूनही पुरेशा कंपन्या नसल्याने तरुणांना नोकरीसाठी गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा बेळगावसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. एकेकाळी कुडाळ एमआयडीसी रोजगाराने गजबजलेली होती, पण आता तिची अवस्था बिकट झाली आहे. सावंतवाडीमधील उत्तम स्टील आणि वेंगुर्ल्यातील टाटा मेटालिक्स यांसारख्या कंपन्या बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

​मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी यावर नाराजी व्यक्त करत, “रोजगार निर्मितीसाठी कोकणातील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतील का? अजून किती दिवस रोजगारासाठी स्थलांतर करायचे?” असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला यातून काहीतरी बोध घेऊन सिंधुदुर्गमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ही घटना ‘आत्मनिर्भर सिंधुदुर्ग’ घडवण्याची गरज अधोरेखित करते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षा आहेत. ते रत्नागिरी चे आमदार असलेतरी त्यांचे कुटुंबीय मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील आहेत. उद्योगमंत्री असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान एक हजार रोजगार देणारा प्रकल्प आणला तर काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे.