Eknath Shinde Delhi Tour: दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. एका बाजूला शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित दौरा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले. आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदारांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यानंतर ते सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. पंतप्रधान मोदींशी त्यांनी अर्धा तास संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. अमित शाहांबरोबर बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी यापुढेही महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जावू, असे विधान केले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याबाबत आपण पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो होतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, “आजवर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले, परंतु यावेळी जशास तसे उत्तर देण्याचे धाडस पंतप्रधान मोदींनी दाखवले. तसेच जगभरात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करत आणि शुभेच्छा दिल्या.”
एनडीएमध्ये शिवसेना चौथ्या क्रमाकांचा पक्ष
उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याबाबतच्या विषयावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एनडीए आघाडीतील शिवसेना हा चौथ्या क्रमाकांचा पक्ष आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा आणि एनडीए जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल.
बंद दाराआड काही नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाली? याबद्दल प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे बंद दाराआड काही नाही. आम्ही तिथे खासदारांसह गेलो होतो. त्यांचे विषय या बैठकीत मांडले. त्यांच्याशी राज्यातील विविध विषयांबाबत चर्चा केली.
महायुतीत काही धुसफूस नाही – शिंदे
विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाने मविआच्या ज्या उमेदवारांचा पराभव केला, त्या उमेदवारांना भाजपा पक्षप्रवेश देत असून त्यांना ताकद देत आहे. यावरून महायुतीत आलबेल नाही, असा आरोप होत असल्याबाबतचाही प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यात कोणतीही धुसफूस नाही.