बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी असलेली युती तोडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं”, असे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे

“बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजापाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी युती केली. ज्यावेळी भाजपा केंद्रात सत्तेत आली होती. त्यावेळी त्यांच्या सोबतीला अनेक मित्रपक्ष होते. पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात शिवसेना तसेच अटलजींच्या नेतृत्वात तृणमूलही भाजपासोबत होते. मात्र, हळूहळू सर्व पक्ष भाजपापासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, तेसुद्धा आज बाहेर पडले आहेत. भाजपा आमच्या कामकाजात सातत्याने दखल देत होती, असा आरोप नितीशी कुमार यांनी केला आहे. तशाच प्रकारचे आरोप अन्य पक्षांनीही सोडून जाताना केले होते. नितीश कुमारांनी देशभरात एक मोठं उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी आजची परिस्थिती आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कालचा दिवस बिहारच्या राजकारणातला ‘वादळी दिवस’ ठरला. काल दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत युती केली आहे. त्याचबरोबर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून वेळही घेतला आहे. भाजपा-जेडीयूचं सरकार कोसळल्यानंतर, आज दुपारी दोन वाजता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारच्या राजभवनात आज हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.