महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचं नुकतेच खातेवाटप झालं आहे. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळाली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. तसेच अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदारांनी विरोध केला होता. पण अजित पवारांकडेच अर्थखातं देण्यात आलं आहे. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री नियुक्ती करण्याबाबत राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्यास विरोध केला आहे.

“काहीही झालं तरी बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री होऊ देणार नाही, अशी थेट भूमिका संजय गायकवाड यांनी घेतली आहे. संजय गायकवाड यांच्या भूमिकेमुळे महायुतीत नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकला आणि…”, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

खरं तर, आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटप करताना भेदभाव करतात, असा आरोप त्यावेळी आमदार गायकवाडांनी केला होता.

हेही वाचा- “अजित पवार गट नक्की अपात्र होणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचं थेट विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार राजेंद्र शिंगणे हे जवळपास अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं तर तुम्हाला ते मान्य असेल का? असा प्रश्न विचारला असता आमदार संजय गायकवाड म्हणाले, “काहीही झालं तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही.” बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार व एक खासदार आणि भाजपाचे ३ आमदार आहेत. त्यामुळे एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळू देणार नाही, अशी थेट भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.