शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ वाढतच चाललं आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांपैकी काही आमदारांना बळजबरीने गुवाहाटीला नेल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. पण आम्ही स्वत:च्या इच्छेनं आलो असून आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, असं विधान शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलं आहे.

त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बंडखोरी का केली? याची कारणंही त्यांनी संबंधित व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलताना ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा आणि आनंद दीघे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहेत. शिंदे साहेबच आमचे नेते आहे. सध्या आम्ही गुवाहाटीला आलो आहोत, मी माझ्या इच्छेनं येथे आलो आहे. माझ्या नांदगाव मतदार संघाचा विकास करण्यासाठी येथे आलो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “सध्या अस्तित्वात असलेल्या योजना जर आपल्याला मार्गी लावायच्या असतील, तर आपल्याला शिंदे साहेबांसोबतच थांबावं लागेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार जर पुढे घेऊन जायचे असतील तर आपल्याला शिंदे साहेबांसोबत थांबावं लागेल. नांदगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही इकडे हसत खेळत राहत आहोत, शिवसेनाच नव्हे तर इतर कोणत्याही नेत्याच्या संपर्कात आम्ही नाही. आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत आणि मरेपर्यंत हिंदुत्वासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबतच राहू.”