लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन आठवडे झाले. मात्र, अद्यापही ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाईकावर मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे.

या सर्व प्रकरणावर विरोधकांकाडून सत्ताधाऱ्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर अखेर आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील या मतमोजणीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. “ईव्हीएम हॅक करता येत नाही. ईव्हीएम मशीन ही पूर्णपणे स्वतंत्र प्रणाली असून तिला अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही. त्यामुळे ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही”, असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव…”, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार; म्हणाले, “मी महत्व…”

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी काय म्हणाल्या?

“ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही मोबाइल ओटीपीची आवश्यकता नाही. ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. तसेच जी तक्रार दाखल झालेली आहे, त्या मोबाईलचा या मतमोजणीशी काहीही संबंध नाही. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यासंदर्भात आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे”, असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं.

मोबाईलच्या ओटीपीचा आरोप होत आहे. त्यासंदर्भात बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं, “जो गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये कोणत्याही मोबाईल ओटीपीचा उल्लेख नाही. ईव्हीएम मशीन ओपन करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही. यामध्ये मी निवडणूक अधिकारी म्हणून ५ तारखेला यासंदर्भात पोलिसांना पत्र दिलं. त्यानंतर आम्हाला ११ तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं. त्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूने गुन्हा नोंदवा असं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही १३ तारखेला गुन्हा दाखल केला. यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मोबाईल वापरल्याचं म्हटलं आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ठाकरे गटाकडून येथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावर सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाच्या परवानगीनंतर दिले जातील, असं आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबरोबरच त्यांनी सांगितलं, “आक्षेपानंतर मतमोजणी केंद्रावर मतांचं व्हेरिफेकेशन झालं. पोस्टल बॅलेट पेपरची फेरपडताळणी झाली. यामध्ये कोठेही रिकाऊड झालेलं नाही. ४८ चा जो लीड होता तो लीड फेरपडताळणी पूर्वीच होता. तो तसाच राहीला. मुळात मतमोजणीचा आणि अज्ञात व्यक्तीचा मोबाईलचा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्ट नाहीत”, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केला आहे.