बार्शी शहरात उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानासमोर प्रवेशद्वारावर प्रचंड आवाजाची स्फोटके फेकण्यात आली. याप्रकरणी पाचजणांविरूध्द बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात स्वतः दिलीप सोपल यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पशा रणझुंजारे, अंबादास रणझुंजारे, नागेश मोहिते, नरेश पवार, नीलेश मस्के (सर्व रा. बार्शी) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. सोपल यांच्या निवासस्थानामोर स्फोटके फेकण्याचा प्रकार २३ आॕक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर घडला होती. त्याबाबतची फिर्याद सोपल यांनी गुरूवारी, आठवड्यानंतर दिली आहे.
सोपल कुटुंबीय मध्यरात्री आपल्या निवासस्थानात झोपेत असताना अचानकपणे प्रचंड आवाजाच्या स्फोटके फोडण्याचा प्रकार घडला. तेव्हा झोपेतून जागे झालेल्या सोपल यांनी निवासस्थान परिसरातील सीसीटीव्ही कॕमेरे तपासले असता निवासस्थानासमोर प्रवेशद्वारावर पाचजण प्रचंड आवाजाची स्फोटके फेकत असल्याचे दिसून आले. दोन स्फोटके प्रवेशद्वाराच्या आत येऊन पडली. तर एक स्फोटक प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर पडले. यात गवत जळाले आणि इतर नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट हे करीत आहेत.
बार्शी तालुक्याच्या राजकारणात दिलीप सोपल आणि भाजापचे सहयोगी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटात अधुनमधून संघर्ष होतो. यात काहीवेळा रक्तरंजित घटनाही घडतात. सोपल यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके फेकण्याच्या घटनेला याच संघर्षाची पार्श्वभूमी आहे की आणखी काही वेगळेच कारण असू शकते, हे पोलीस तपासातून समोर येऊ शकेल.