बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी पंडित यांच्याविरुद्ध खंडणीखोरीची आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांच्याविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे ‘या प्रकरणात दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे आ. पंडित यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. पंडित यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकी दिल्याचे तर पंडित यांनी खंडणी मागितल्याचेा आरोप त्यांनी केला आहे. ‘पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा,’ असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तिने आपल्याकडे पोहचवला होता, असे शेळके यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

दरम्यान, अमरसिंह पंडित यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शेळके यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकार्‍याच्या तक्रारीला आणि दबावाला मी घाबरणार नाही, जनसामान्यातील माझी प्रतिमा डागाळण्याचा हा कुटील डाव आहे, शेळकेंचा बोलविता धनी कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात दोषी आढळल्यास राजकीय जीवनातून संन्यास घेईल, असे त्यांनी सांगितले. शेळके हे भ्रष्ट असून औरंगाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. त्यावरून ते निलंबितही झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काय आहे प्रकरण?
तीनच महिन्यांपूर्वी पंडित यांनी शेळके यांच्याविरोधात केरोसिन परवाना अनियमिततेविरोधात तक्रार केली होती. त्याची चौकशी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion against ncp mla amarsingh pandit in beed
First published on: 22-03-2018 at 04:03 IST