सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना जबरदस्तीने खंडणी मागण्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला असून याप्रकरणी एका सराईत गुंडासह दोघाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्गणीच्या नावाने खंडणी मागून नागरिकांना त्रास देणा-या गुंडांविरूध्द कठोर कारवाई करण्याचा इशारा शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला आहे.

सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७० फूट रस्त्यावर समर्थ ज्वेलर्स दुकानात दोघा तरूणांनी येऊन छत्रपती शाहू मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी दोन हजार रूपयांची वर्गणी पावती दिली असता दुकानमालक अमीन शेख यांनी, आम्ही व्यापारी असोसिएशनमार्फत वर्गणी देतो. त्यासाठी असोसिएशनच्या अध्यक्षांना भेटा किंवा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा, असे सांगितले. परंतु मंडळाचे पदाधिकारी राम अशोक जाधव व इतरांनी वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने खंडणी मागितली.

हेही वाचा…सोलापुरात तीन लाख मताधिक्याने निवडून येण्याचा राम सातपुते यांना विश्वास

तुमच्या असोसिएशनच्या अध्यक्षाला आमच्या मंडळाचे संस्थापक नागेश प्रकाश इंगळे ऊर्फ एन. भाई यांना भेटायला पाठवून द्या, असे धमकावले. राम जाधव व इतरांनी वर्गणीची पावती जबरदस्तीने देऊन गेल्यानंतर दुकानमालक शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत बाबुरव पगडे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राम जाधव आणि नागेश इंगळे ऊर्फ एन. भाई यांच्या विरूध्द जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…सोलापुरात अवकाळी पावसातच प्रणिती शिंदे यांची सभा

यातील नागेश इंगळे ऊर्फ एन.भाई हा पोलिसांकडील नोंदीनुसार सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या विरूध्द यापूर्वी तडीपारीसह एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दतेचीही कारवाई करण्यात आली होती.