भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्य्यावरून आता सत्ताधारी विरुद्ध भाजपा असा नवा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमय्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत भाजपावर टीका टिप्पणी सुरू केली आहे. एवढच नाहीतर या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीसही प्राप्त झाली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर संताप व्यक्त करत, जोरदार टीका केली आहे.

“मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!” असं देवेंद्र फडणीस यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा!, हाच का तुमचा पारदर्शी कारभार?” असा सवाल देखील फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद; काँग्रेस, राष्ट्रवादीचा संताप, म्हणाले “मानसिक स्थिती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?” असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.