साता-याचा एव्हरेस्टवीर आशिष माने याने जगातील पाचव्या क्रमांकाचे मकालू शिखर (उंची ८ हजार ४८१ मीटर) रविवारी पहाटे सर केले. आशिषच्या या यशाने आम्हाला अत्यंत आनंद तर झालाच आहे मात्र त्याचा अभिमान वाटतो, असे माने कुटुंबीयांनी सांगितले.
पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ या संस्थेच्या वतीने एप्रिल महिन्यात माउंट मकालू मोहीम सुरु झाली. मोहीम अंतिम टप्प्यात असताना म्हणजे शिखर १८१ मीटरवर दिसत असताना हवामान खराब झाले. तसेच गिर्यारोहणासाठी आवश्यक रोप-दोर संपले. या बिकट परिस्थितीत नाराज झालेले आशिष माने आणि आनंद माळी हे दोघे माघारी बेस कँपवर आले. या वेळी मोहीम गुंडाळण्याची तयारी या दोघांची झाली होती मात्र त्यांच्या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी त्यांचे मनोधर्य वाढवले आणि पुन्हा चढाईसाठी प्रयत्न करण्यात आले. या वेळी दोर, खाण्याचे पदार्थ, प्राणवायूचे सिलिंडर्स हेलिकॉप्टरने पुढे पोचवण्यात आले. त्यानंतर दि. २१ मे रोजी चढाईस प्रारंभ झाला. समुद्रसपाटी पासून ७ हजार ६०० मीटर कँप तीन वर ते शनिवारी दुपारी पोचले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी अंतिम चढाईस प्रारंभ केला. सुमारे नऊ तासांचा कालावधीत त्यांनी हे अंतर पार केले.
मकालू शिखर हे माऊंट एव्हरेस्टपासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. ते तिबेट-नेपाळ सीमेवर आहे. चढाईला अत्यंत अवघड असा त्याचा लौकिक आहे.माने याने २०१२ मध्ये एव्हरेस्ट, २०१३ मध्ये ल्होत्से तर या वर्षी मकालू शिखर सर केले आहे. आशिष मानेच्या घरी ही बातमी पोचताच आनंदाचे वातावरण पसरले, त्याच्या घरच्यांनी आम्हाला आशिषचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले. मात्र आशिष घरी येईपर्यंत जीव था-यावर नसतो असे त्याच्या आईने सांगितले.