सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.
शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली. मात्र, यासाठी सरकारी भावाने पैसे देण्यात आले. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील गेली दोन वर्ष लढा देत होते. आठवडाभरापूर्वी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते. रविवारी रात्री जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर टीकस्त्र सोडले. ‘सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. मर्जीतील कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजली ची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही ‘आपले सरकार’ सारखी नाटके बंद करून टाका, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार @CMOMaharashtra तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले आहे. या सरकारचा धिक्कार असो.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 28, 2018
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. हा सरकारी अनास्थेचा बळी असून या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.