सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावातील एका शेतकर्‍याचा रान गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राघू जानू कदम असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. दुपारनंतर गावातील अन्य लोक शेतात गेले असताना त्यांना राघू कदम जखमी अवस्थेत निपचित पडलेले दिसले. गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात कदम गंभीर जखमी होत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महाबळेश्वर तालुक्यात रान गव्यांची तसेच रान डुक्करांची आणि वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. या प्राण्यांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तसेच या वन्य प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. त्यामुळे या भागात सध्या दहशतीचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.

आजच्या घटनामुळे गावातील तसेच विभागातील शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुःखद घटना समजताच परिसरातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. रानगवे. रान डुक्कर यांच्यापासून होणाऱ्या या वाढत्या हल्ल्यांविरोधात त्यांच्या संतापाचे वातावरण आहे. या वाढत्या हल्ल्यांविरोधात लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा
भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर बसस्थानके हाऊसफुल्ल; प्रवाशांचा खोळंबा…

घटनास्थळी वन विभागाने अधिकारी, पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू केली असता गावकऱ्यांनी त्यास विरोध सुरू केला. ग्रामस्थांनी मृतदेह हलविण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला.

दरम्यान तापोळा परिसरात गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरातील १०५ गावात पसरताच या परिसरातील ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी वन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या हल्ल्यात होणाऱ्या नुकसानीबद्दल ताबडतोब मदतीची मागणी केली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने तीन ते चार दिवसात मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुट्टीचा कालावधी सोडला तर लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मात्र जोपर्यंत वनविभागाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्यामध्ये आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर चार दिवसांच्या आत मदत मिळवून देऊ आणि तापोळा परिसरातील १०५ गावच्या समाज बैठकीला नियमित उपस्थित राहु असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर गावकऱ्यांचा रोष शांत झाला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.