कराड : ऊसतोड हंगामासाठी मजूर पुरवतो असे भासवून कोर्टी (ता. कराड) येथील संदीप सूर्यकांत थोरात या शेतकरी व ट्रॅक्टर व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, नूतन वसाहत, शंकरनगर, जालना) याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊसतोड व वाहतुकीचे काम करतात. सन २०२२-२३ या हंगामात अशोक ढगे हा त्यांच्याकडे मुकादम म्हणून काम करत होता. त्या वेळी त्याने विश्वास संपादन करत पुढील हंगामासाठी नऊ जोड्या म्हणजे १८ मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात त्याने थोरात यांच्याकडून दीड लाख रुपये रोख, त्यानंतर ३ जून २०२३ रोजी कराड येथे नोटरी करार करत आणखी २ लाख रुपये घेतले. त्याचबरोबर थोरात यांनी त्यांच्या बँक खात्यातून ५ जून ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान, टप्प्याटप्प्याने एकूण ७ लाख रुपये अशोक ढगेच्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठवल्याने एकूण १० लाखांपर्यंत रक्कम ढगेकडे पोहोचली.
मात्र, करारानुसार दिलेले काम न करता तो पसार झाला. १२ नोव्हेंबर रोजी थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी जालना येथे जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी काही मजूर आणतो असे सांगत ढगेने वेळ मारून नेली. पण, १८ डिसेंबरला रातोरात तो, पत्नी व इतर मजुरांसह पसार झाला. त्याचा भ्रमणध्वनी बंद असून, अजिबात संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप थोरात यांनी कराड शहर पोलिसांत तक्रार दिली. यावर अशोक ढगेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.