हिंगोली : सोयाबीनचा हेक्टरी आठ ते बारा क्विंटलपर्यंत मिळणारा उतारा अतिवृष्टीमुळे आता कमालीचा घटला आहे. जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पीककापणी प्रयोगात सोयाबीनला हेक्टरी दोन क्विंटल एक किलोचाच उतारा आला आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीकडून विमा मंजूर होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. हेक्टरी दोन क्विंटल एक किलोचा उतारा मिळाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत विभागाच्या उपस्थितीत मंडळामध्ये प्रत्येकी चार ठिकाणी विविध पिकांचे पीककापणी प्रयोग घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी चिखली येथील नागोराव भाऊराव चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतात प्रयोग घेण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्यासह विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या पीककापणी प्रयोगामध्ये सोयाबीनचे उतारा हेक्टरी दोन क्विंटल एक किलो आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले. याशिवाय सोयाबीनचे दाणेही काळे पडले असून, पूर्ण भरले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्याच पीक कापणी प्रयोगातून अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट अधोरेखित झाले.
जिल्ह्यात खरीप हंगामात २.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती, त्या पाठोपाठ सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली. परंतु या वर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी, नाल्याकाठच्या जमिनी, तर पुराच्या पाण्यात पिकासह खरडून वाहून गेल्या. जिल्ह्यात सुमारे ३ लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. बाधित शेतकऱ्यांचे लक्ष विमा कंपनीच्या निर्णयाकडे लागले.
पीककापणी प्रयोगानंतर येणाऱ्या उत्पन्नावर आधारित विमा मिळणार आहे. त्यामुळे असे प्रयोग सर्वच ठिकाणी घेतले जावेत, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विमा कंपनीला केल्या होत्या. तर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही कंपन्यांना कडक शब्दांमध्ये इशारा दिला होता.
उत्पादकता हेक्टरी बारा क्विंटल
जिल्ह्यात सोयाबीन पिकाची उत्पादकता हेक्टरी बारा क्विंटल असून, जोखीमस्तराची उत्पादकता हेक्टरी साडेआठ क्विंटल आहे. मात्र या वर्षी केवळ हेक्टरी दोन क्विंटल उत्पादन येत असल्याने पीकविमा कंपनीला आता शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा लागेल, अशी शेतकरी वर्गातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.