सोलापूर : सावळ्या विठू माउलीच्या दर्शनाची आस लागून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत देहूतून पायी निघालेल्या आणि पंढरपूर जवळ आले असतानाच एका महिला वारकऱ्यावर काळाने घाला घातला. वारीमध्ये एका मोटारीखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची विठ्ठलाच्या दर्शनाची इच्छा अपूर्ण राहिली.
उषाबाई अशोक व्यवहारे (वय ६०, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे या वारकरी महिलेचे नाव आहे. व्यवहारे श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत पंढरपूरकडे येत होत्या. टाळ मृदंगाच्या निनादात, अभंग, भजनांचा आनंद घेत आणि मुखी विठ्ठलाचा गजर करीत उषाबाईंची विठ्ठल भेटीची व्याकुळता वाढली होती. बुधवारी रात्री पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील तोंडले-बोधले गावाजवळ मुक्कामी होता. दुसऱ्या दिवशी पहाटे हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्याच्या तयारीत होता. यावेळी उषाबाई व्यवहारे तयार होऊन रस्ता ओलांडत असताना पालखी सोहळ्यातीलच एका मालमोटारीखाली त्या सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उषाबाई गेल्या अनेक वर्षांपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात श्रीक्षेत्र देहूपासून सहभागी व्हायच्या. त्यांचा वारीतच अपघाती मृत्यू झाल्याने पालखी सोहळाही काहीवेळ स्तब्ध झाला.