मुरुडमधील समुद्रात पुण्याच्या कॅम्प भागातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी मंगळवारी महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि सहल घेऊन गेलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिक्षक आणि संस्थाचालकांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित विद्यार्थ्यांचे पालक अडीच महिने प्रयत्न करत होते. पण पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. अखेर पालकांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १३० विद्यार्थ्यांची सहल एक फेब्रुवारीला मुरुडला गेली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण पुण्यातील राहणारे आहेत. दुपारी जेवण करून समुद्रात आतमध्ये गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने २१ जण बुडाले. ही घटना कळताच मच्छिमारांनी लगेचच समुद्रात उतरून बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पाण्यात बुडून १४ जणांचा मृत्यू झाला. सात जणांना वाचविण्यात यश आले होते. मृत पावलेले सर्वजण १८ ते २२ वयोगटातील आहेत.