महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खून खटल्यातील आरोपी आणि गुंड सलीम मोहंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर पाच ते सहा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी कराडमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात गोळीबार केला. गोळीबारात सलीम शेख जखमी झाला असून, त्याच्यावर कराडच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामध्ये न्यायालयाच्या परिसरात असलेले दोन नागरिकही किरकोळ जखमी झाले आहेत. महादेव गुजले आणि प्रशांत दुपते अशी त्यांची नावे आहेत. 
सन २००४ साली दत्तात्रय चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सलीम शेख व या गुन्ह्यातील संशयित बाळू रेठरेकर, संजय गुलाब कागदी हे न्यायालयात आले होते. यावेळी अज्ञात तरुणांनी सलीमला लक्ष्य करून गोळीबार केला. सलीम शेख याच्या उजव्या मनगटाला व मणक्यामध्ये गोळी लागली आहे. त्याच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. सलीम शेखवर उपचार सुरू असलेल्या सह्याद्री रुग्णालयात तीन अधिकारी व २० कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. गोळीबाराचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी तीन पथके रवाना केली आहेत.