टाळेबंदी मुळे देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी केंद्र शासनाने विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार पहिल्या रेल्वेला सोमवारी सायंकाळी कोल्हापूर मध्ये हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कोल्हापूरपासून निघालेली ही श्रमिक एक्सप्रेस मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे जाणार आहे. यामध्ये २२ बोगीतून १०६६ प्रवासी प्रवास करीत आहेत.
करोना विषाणूच्या संसर्ग वाढू नये यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. सुमारे दीड महिन्यापासून उद्योग बंद असल्याने कामगारांना कामापासून वंचित राहावे लागले आहे. एकीकडे काम नाही आणि दुसरीकडे घर खर्च वाढत आहे. अशातच गावाकडची लागलेली ओढ अशा कोंडीत हे कामगार अडकले होते. अनेक कामगार तर चालत किंवा सायकलने गाव गाठण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांची ही धडपड लक्षात घेऊन शासनाने कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आज कोल्हापुरातून पहिली रेल्वे रवाना झाली. कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आज दिवसभर या परप्रांतीयांना मूळगावी पाठवण्याच्या तयारीच्या हालचाली वाढल्या होत्या. रेल्वे स्थानकाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. लोखंडी जाळ्या लावलेल्या होते. कामगारांची व नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली प्रमाणपत्र पाहून त्यांना आत प्रवेश दिला जात होता. या सर्वांवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून होते.
रेल्वे पाच वाजता निघणार असली तरी दुपारपासूनच जागा मिळवण्यासाठी प्रवाशी गर्दी करीत होते. सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर ते जबलपूर ही पहिली पहिली रेल्वे निघाली. या रेल्वेला जिल्हाधिकारी दौलत देसाई,आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी हिरवा कंदील दर्शविला, या प्रवाशांची प्रवासामध्ये आबाळ होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने त्यांना अन्नाची पाकिटे, बिस्किट, पाण्याच्या बाटली आदी साहित्य वाटप करण्यात आले. पहिल्या रेल्वेतून १०६६ प्रवाशांनी प्रवास केला असे कोल्हापूर रेल्वे व्यवस्थापक फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले.