प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आर्थिक यश मिळवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

मजूर नवऱ्यासोबत संसार करताना जाणवणाऱ्या चणचणीपोटी स्वत: तूटपूंज्या भांडवलावर व्यवसाय यशस्वी केला. सर्वत्र नाव झाले. व्यावहारिक ज्ञान घेण्यासाठी मिळालेला विदेशवारीच्या संधीचाही फायदा झाला. आता विदेशातून पहिला ‘ऑर्डर’ मिळालेल्या बचतगटाच्या ‘पंचकन्या’ देशाचे नाव उज्ज्वल करण्यास सज्ज झाल्या आहेत.

वर्धेलगत सिंदी (मेघे) येथील या पाच महिलांची व्यावसायिक भरारी थक्क करणारी आहे. संगीता गायकवाड यांच्या नेतृत्वात वनिता आडूरकर, प्रिया डबके, संगीता शेंद्रे व गीता पटले या पंचकन्यांचा जीवनोन्नती महिला बचतगट राज्यात आदर्श ठरत आहे. शासनमान्य दारिद्रय़रेषेला ओलांडू न शकणाऱ्या कुटुंबातील या पाचही जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. नवरा मजुरी करणारा. थोडय़ा पैशात घर चालवायचे कसे, याची भ्रांत असलेल्या या पाचही महिलांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनात दहा हजारांच्या भांडवलावर २००९ साली बचतगट स्थापन केला. कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर लगेच घरी उद्योग थाटला. दोन हजार रुपयाचा माल विकून तीन हजार रुपये आले. त्यात पुढे वाढच होत गेली. आज वार्षिक उलाढाल पाच लाख रुपयांवर पोहोचली आहे. मासिक सात ते आठ हजार करुपये प्रत्येकी नफा मिळतोय.

गटाचे वेगळेपण एवढय़ावरच थांबत नाही. त्यांच्यासोबतच स्थापन इतर गटांचे कार्य थांबले. पण, या पाच जणी एकमेकींशी घट्ट बंध जुळल्याने यश मिळवत गेल्या. सर्व महिला बचतगटांची वर्धिनी सेवा संघ ही शिखर संस्था असून त्याचे अध्यक्षपद संगीता गायकवाड यांच्याकडे आले. त्या पाचशेवर महिलांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करतात. नेतृत्वशैली पाहून त्यांची निवड मोठय़ा कार्यासाठी झाली. राज्य शासनाच्या उमेद व इंडियन चेंबर्स ऑफ  काँमर्सच्या संयुक्त विद्यमाने बचतगटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत आयोजिण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात गेलेल्या चमूत संगीता यांच्यासोबत जळगाव, पालघर व बीड येथील तीन महिला होत्या. या चौघींनी शिष्टमंडळासह सॅनफ्रन्सिस्को, न्यूयॉर्क, बोस्टन या शहरांना भेटी दिल्या. थेट फेसबुकच्या कार्यालयास भेट देण्याची संधी त्यांना मिळाली. हे नवेच विश्व होते. त्या ठिकाणी त्यांच्या गटाचे फेसबुक खाते उघडून त्यावर उत्पादित मालाची जाहिरात करण्यात आली. विविध उद्योग समूहांना भेटी दिल्यावर व्यवसायाचे नवेच दर्शन घडल्याचे संगीता गायकवाड सांगतात. भेटीनंतर आता तीनच महिन्यात विदेशातून मालासाठी नोंदणी सुरू झाली. कापडी बॅग व फाईल फोल्डरची ऑर्डर मिळाली. व्यावहारिक औपचारिकता अद्याप सुरू आहे, पण मोठी उलाढाल होण्याचा विश्वास वाटतो, असे श्रीमती गायकवाड नमूद करतात.

जीवनोन्नती अभियानाचे अधीक्षक अमोल भागवत सांगतात, या बचतगटांचे ‘फिक्की’ संघटनेच्या माध्यमातून सामंजस्य करार होत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात याबाबत पुढाकार घेतल्याने बचतगटाचे उत्पादन अ‍ॅमेझॉन व अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत विकले जातील. संगीता गायकवाड यांच्या नेतृत्वातील ‘वर्धिनी’सोबत हे करार होत आहेत. एका मोठय़ा बाजारपेठेच्या दिशेने या महिलांच्या उद्योगाचा प्रवास सुरू राहणार आहे. संगीता गायकवाड म्हणतात की संघटनशक्ती, प्रामाणिकपणा व काही नवे करण्याची जिद्द हीच आमच्या कार्याची प्रेरणा आहे. समाजात आम्ही कुणीच नव्हतो. आता दखलपात्र आहोत. पंचकन्यांचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five successful women in business who overcame challenges
First published on: 08-03-2019 at 01:28 IST