नांदेड : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गुरुवारी किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ येथील नाल्यातून बैलगाडीने माल आणत असताना बैलगाडी वाहून गेल्याने एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत चौघेजण थोडक्यात बचावले.मागील तीन दिवसांपासून किनवट, माहूर, मांडवी, शिवणी परिसरात पावसाची संततधार आहे. आप्पाराव पेठ परिसरातील एका नाल्यातून बैलगाडी जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती बैलगाडी उलटली.
बैलगाडीतून प्रवास करणारे शेतकरी गजव्वा गुमुल, लक्ष्मीबाई गुमुल, रुक्माबाई हळदे व लक्ष्मीबाई देशमुख हे बचावले. याच बैलगाडीतून प्रवास करणारा अभिनव गजेंद्र गुमुल (वय ५) पाण्यात वाहून गेला. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बालकाचा शोध सुरू केला. पण, दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर या बालकाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेने आप्पाराव पेठ या गावात शोककळा पसरली.