नांदेड : रिबंदर-गोवा येथील वय वर्षे जेमतेम दोन असलेली ‘फ्लाय ९१’ ही विमान कंपनी गोवा-नांदेड-बंगळुरू या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुक आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे एक पथक नांदेड येथे येऊन गेले. तसा प्रस्ताव या कंपनीने दिला असून, विनाअडथळा तो मंजूर झाल्यास जुलैअखेर वरील मार्गावर सेवा सुरू होऊ शकते. दरम्यान, नांदेड विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पावसाळ्यामुळे रखडल्याचे समजते.

गतवर्षी १ एप्रिलपासून नांदेड विमानतळ पुन्हा कार्यान्वित झाले. उडान योजनेंतर्गत हैदराबाद, अहमदाबाद, भूज, हिंडन (दिल्ली), जालंधर, बंगळुरू या शहरांना स्टार जेट या कंपनीच्या हवाई सेवेने जोडण्यात आले आहे. कालांतराने याच कंपनीने पुणे व नागपूर येथेही सेवा सुरू केली होती; परंतु, नागपूर सेवा बंद पडली आहे. पुण्यासाठी मात्र प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. वास्तविक पाहता सर्वच मार्गावर प्रवासी प्रतिसाद उत्तम असून, दिल्लीसाठी तर एक फेरी कमी पडते आहे. कारण स्टार जेट ही सुद्धा कंपनी नवीन असून, ७२ आसन क्षमतेचे हे विमान आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्येच फ्लाय ९१ ही कंपनी नांदेड-गोवा या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुक होती. परंतु, त्यावेळी ते शक्य झाले नाही. ही कंपनी २०२४मध्ये स्थापन झाली आहे. कंपनीकडे एटीआर ७२ या पद्धतीचे तीन विमाने आहेत. हर्ष राघवन हे संस्थापक अध्यक्ष असून, मनोज चाको हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १८ मार्च २०२४ रोजी या कंपनीने सिंधुदुर्ग, बंगळुरू आणि हैदराबाद येथे सेवा सुरू केली. तर एप्रिल २०२४ मध्ये लक्षद्वीप आणि जळगाव या शहरांना जोडले आहे. त्याचवेळी नांदेड रांगेत होते. पण, आता कंपनीने प्रत्यक्ष हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने एक पथक येथे येऊन गेल्याचे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. नांदेड विमानतळावरील धावपट्टीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. धावपट्टीची स्थिती चांगली नसल्याने गतवर्षी स्टार जेटसाठी लवकर परवानगी मिळत नव्हती. परंतु, नंतर ती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईची प्रतीक्षा कायमच

नवी मुंबई येथील विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नांदेड-मुंबई या लोकप्रिय व बहुप्रतीक्षित मार्गावर सेवा केव्हा सुरू होते, याबाबत उत्सुकता आहे. त्यासाठी विविध स्तरावरून पाठपुरावाही सुरू आहे. पण, आता गोवा आणि बंगळुरू या मार्गावर ‘फ्लाय ९१’ या कंपनीचे स्वागत करण्यात येत आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर वरील माहिती शेअर करीत या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्टार जेट मागील वर्षापासून बंगळुरू येथे सेवा देते आहे. पण आता गोवा हे आणखी एक पर्यटनस्थळ हवाई मार्ग नांदेडशी जोडले जाईल.