कराड : राष्ट्रीय पक्षी मोर व लांडोर पक्ष्यांची शिकार झाल्याची धक्कादायक घटना तुळसण (ता. कराड) येथे परवा रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून मृत मोर व लांडोर, एअरगण (छरा बंदूक), मोटारसायकल हस्तगत करताना, उंडाळे (ता. कराड) येथील एकास ताब्यात घेतले आहे. तर, त्याचे कुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील दोन साथीदार फरार आहेत.

कराड तालुक्यातील कोळे, कासारशिरंबे व म्हासोली येथील वनरक्षक रात्रगस्त घालत असताना, त्यांना तुळसण- ओंड रस्त्यालगतच्या एका शेतामध्ये अंधारात एअरगणचा आवाज आला. सदर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना राष्ट्रीय पक्षी मोर व लांडोर यांची शिकार झाल्याचे आढळून आले. तेथून आरोपी पळून जात असताना, या पथकाने त्यांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन त्याने आपल्याकडील साहित्य व मुद्देमाल जागेवर टाकून तेथून पोबार केला. यानंतर श्वान पथकाला पाचारण केले असता, त्याने उंडाळे येथील संशयिताचे घर दाखवले. त्यामुळे संशयितास ताब्यात घेतले असता त्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कुंडल येथील आपल्या दोन सहकाऱ्यांचीही नावे सांगितली. परंतु, हे दोघे मिळून आले नसून, ते फरार असल्याचे वनविभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या कारवाईत कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील, दिलीप कांबळे आदींनी सहभाग घेतला आहे.

बेकायदा लाकूडतोडप्रकरणी कारवाई

लाकडाची विनापरवाना तोडणी करून वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने धडक कारवाई केली. त्यात तांबवे पूल (ता. कराड) येथे वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वनविभागाच्या वराडे परिमंडलाचे वनपाल संतोष जाधवर यांनी दिलेल्या माहितीनुसार तांबवे पूल येथे ट्रकमध्ये (एमएच. १२, एचडी. ९०५१) विनापरवाना लाकूडतोड करून माल वाहतूक करताना आढळून आल्याने वनविभागाने हा ट्रक पकडून मालट्रकसह दोघांना ताब्यात घेतले.

दोघांवर विनापरवाना लाकूडतोड करून ते वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) ब अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वराडे परिमंडल वनपाल संतोष जाधवर, म्होप्रे वनरक्षक पूजा खंडागळे यांनी केली आहे.