सोलापूर : माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. अलीकडेच काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप आदींनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यात आता माजी महापौर बनशेट्टी यांची भर पडली आहे.

अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या आणि सोलापुरातील काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांच्या नातसून असलेल्या शोभा श्रीशैल बनशेट्टी यांनी सोलापूर महानगरपालिकेत भाजपकडून सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केले होते. २०१७ साली भाजपची महापालिकेत प्रथमच सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा शोभा बनशेट्टी यांना महापौरपद अडीच वर्षे भूषविण्याचा मान मिळाला होता. त्या वीरशैव लिंगायत समाजातून आल्या आहेत. परंतु याच समाजातून आलेले भाजपचे ज्येष्ठ आमदार व सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची नाराजी ओढवून घेत बनशेट्टी यांना महापौरपदाची सूत्रे सांभाळताना महापालिकेत पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आमदार देशमुख आणि बनशेट्टी यांच्यात कधीही दिलजमाई न होता उलट, त्यांनी एकमेकांच्या विरोधात शह-प्रतिशहाचे राजकारण केले होते. त्यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात बनशेट्टी यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून आमदार विजयकुमार देशमुख यांना थेट आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर बनशेट्टी जरी भाजपच्या वर्तुळातून बाहेर पडल्या तरी त्यांचे आमदार देशमुख यांच्या पक्षांतर्गत विरोधकांशी चांगले संबंध आहेत. त्यातून आगामी राजकीय पर्याय निवडण्यासाठी बनशेट्टी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, पक्षाचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे, श्रीशैल बनशेट्टी उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे प्रवक्ते असलेले श्रीशैल बनशेट्टी यांचे मित्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.