सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठोपाठ करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनीही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुक्तागिरी बंगल्यात जगताप यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले.
सोलापूर जिल्ह्यात अलीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांपैकी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेली काही वर्षे कोणत्याही राजकीय पक्षात नसलेले माजी आमदार जयवंत जगताप हे सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे पुत्र आहेत. नामदेवराव जगताप हे चारवेळा तर त्यांचे बंधू आण्णासाहेब जगताप हे एक वेळेस आमदार झाले होते. जयवंत जगताप १९९० साली करमाळा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००४ सालची करमाळा विधानसभा निवडणूक त्यांनी शिवेसेनेकडून लढविली होती आणि दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली होती.
करमाळा तालुक्यातील गटबाजीच्या राजकारणात जगताप यांचा प्रभाव वरचेवर घटत असताना विधानसभा निवडणुकीत १५ हजार मतदारांच्या बळावर कोणाच्या बाजूने ताकद उभी करून निवडून आणायचे, याची सूत्रे अद्यापि जगताप यांच्याकडे कायम आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नारायण पाटील यांना निवडून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्याअगोदर २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीतही तत्कालीन अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या विजयासाठी जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनेक वर्षांपासून त्यांचे वर्चस्व राहिले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.
जगताप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना सांगोल्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, शिवसेना माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील बागल गटाचे दिग्विजय बागल हे शिवसेना शिंदे पक्षात कार्यरत आहेत. तर त्यांच्या भगिनी रश्मी बागल भाजपमध्ये आहेत.
शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार जयवंत जगताप यांनी केला आहे.